राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त...ऑनलाईन व्याख्यान..
"स्वराज्यजननी जिजामाता"
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवमहाराष्ट्र युवा अभियान तर्फे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यान मंगळवार दिनांक १२ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता. प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. स्मिता रावसाहेब देशमुख, प्राचार्य, छत्रपती श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती या "स्वराज्यजननी जिजामाता" याविषयावर गुंफणार आहेत. आपण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या (https://facebook.com/ycp100 ) फेसबुक लाईव्ह वर सहभागी होता येईल..
यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन
नियतकालिक स्पर्धा २०१९-२० चे पारितोषिके जाहिर...
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व नवमहाराष्ट्र युवा अभियान यांचा उपक्रम
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई-नवमहाराष्ट्र युवा अभियान यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा 2019-20’ ची विजयी महाविद्यालयांची नावे घोषीत करण्यात आली आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालीकांमध्ये पडलेले पहावयास मिळते या नियतकालीकांमध्ये आपले लेख, कविता लिहणार्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यीक घडत असतात. युवांना आपले मत मांडायची संधी देतानाच त्यांच्यातील कलागुणांना वाव देणार्या नियतकालीकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालीकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे. यावर्षीपासून विद्यापीठ निहाय प्रत्येकी एक विशेष पारितोषिकाचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला होता.
नूतन महाविद्यालय, सेलू, जि. परभणी च्या ‘प्रेरणा’ (वाङमय विशेषांक) या नियतकालीकाने प्रथम क्रमांक पटकाविला असून रु. 10,000/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. प्रेरणा या नियतकालीकामध्ये विद्यार्थ्यातील सर्जनशिलता, भाषिक अविष्कार, प्रतिभा यांना चालना देणारा हा अंक आहे. या अंकामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील विचार, कल्पना, अपेक्षा यांना लालित्यपूर्ण भाषेत शब्दरूप मिळेल. तसेच या अंकाच्या निमित्ताने वेगवेगळे साहित्य वाङमय हे विद्यार्थ्यांकडून वाचले जातील. तसेच त्यांच्यातील वाचनाचे संस्कार आणि वाचन संस्कृती अभिवृद्धीत होण्यासाठी हा विशेषांक प्रेरणा देणारा ठरेल.
द्वितीय क्रमांक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव, ता. जुन्नर, जि पुणे या महाविद्यालयाच्या ‘गुरुवर्य’ (पर्यटन विशेषांक) या नियतकालीकास मिळाला आहे. रु. 7,000/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. गुरुवर्य या अंकात सबंध जुन्नर तालुक्याचा निसर्ग खजिना वाचकांसमोर उपलब्ध केला गेला आहे. जुन्नर तालुक्याला ऐतिहासिक झालर तर आहेच त्यासोबतच निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे हे या अंकातून दिसून येते. लेणी, किल्ले, अर्थशास्त्र पर्यटन स्थळ, भौगोलिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, या सगळ्या माहितिने हा अंक परिपूर्ण आहे. निश्चितच भविष्यात ह्या अंकाचा फायदा पर्यटकांना होईल.
तृतिय क्रमांक विवेकानंद कॉलेज (स्वायत्त), कोल्हापूरच्या ‘विवेक’ (भाषा विशेषांक) या नियतकालीकास मिळाला असून रु. 5,000/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्याने तिच्याकडे पाहण्याच्या विविध रीती आणि दृष्टिकोन संभवतात. साहजिकच तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकारे केल्या गेल्या आहेत. हे आपल्याला ह्या अंकातून पहावयास मिळते. तसेच या अंकात कला, क्रीडा, भाषा साहित्य आणि संस्कृती ह्या सगळ्या बाबींचा लेख स्वरुपात आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त विद्यापीठनिहाय प्रत्येकी एक पारितोषिक असे एकून नऊ पारितोषिके जाहिर करण्यात आली आहे. रु. 3,000/- चा धनादेश, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या बक्षिसाचे स्वरूप आहे. त्यांची नावे अशी - कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, सिडको, नाशिक यांच्या ‘एकता’ (लिंगभाव समानता विशेषांक) नियतकालीकास, लोकसेवक मधुकराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय, जळगाव यांच्या ‘जागर’ (प्लास्टिक बंदी आणि पर्यावरण विशेषांक) या नियतकालीकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद संलग्नीत रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, उस्मानाबाद यांच्या ‘विवेकानंद’ या नियतकालीकास, द.भै.फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर यांच्या ‘दयानंद’ या नियतकालीकास, हिल्पोस कॉलेज, नागपूर यांच्या ‘हिलसोपियन’ या नियतकालीकास, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन फॉर वुमेन, शिरगाव, रत्नागिरी यांच्या ‘तरंग’ या नियतकालीकास, महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. नसरुद्दीन पंजवानी वाणिज्य महाविद्यालय, अस्मोनी, जि. गडचिरोली यांच्या ‘शब्दशिल्प’ या नियतकालीकास, भारतीय महाविद्यालय, अमरावती यांच्या ‘भारती’ या नियतकालीकास तर शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती यांच्या ‘शिववाणी’ या नियतकालीकास विशेष पारितोषिके जाहिर करण्यात आले आहेत.
निवड झालेल्या सर्व महाविद्यालयांचे प्रतिष्ठानच्या कार्यकारी समितीने अभिनंदन केले असून सदर पारितोषिके त्या-त्या महाविद्यालयात जाऊन समारंभ पूर्वक वितरीत केल्या जातील, असे नवमहाराष्ट्र युवा अभियानाच्या वतीने कळविण्यात आले आहे.