banner

मुलांचे हवामान अध्ययन केंद्र प्रकल्प...



यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा आणि खासदार माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियानतर्फे शाळांमध्ये मुलांचे हवामान अध्ययन केंद्र हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. गेली पाच वर्षे सुप्रियाताई सुळे या वसुंधरा अभियानमार्फत शाळा-शाळांमध्ये पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बद्दल याविषयी जनजागृतीचे काम करीत आहेत. मुलांचे हवामान अध्ययन केंद्र प्रकल्प हा याच कामाचा पुढील टप्पा आहे.
महाराष्ट्राच्या बदलत्या तापमानाला आणि हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे आव्हान भविष्यात येणा-या पिढीला पेलता येण्यासाठी अशा प्रकारच्या अनेक शैक्षणिक उपक्रमांची आवश्यकता आहे. महाराष्ट्राचे भवितव्य घडविणारी भावी पिढी येणा-या पर्यावरणीय आपत्तीला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आशा उपक्रमातून तयार व्हावी हे या प्रकल्पाचे अंतिम ध्येय आहे.

या प्रकल्पाअंतर्गत तलासरी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय येथे बुधवार दिनांक १८ जानेवारी २०१७ रोजी पहिले सत्र घेण्यात आले. या सत्रात हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ म्हणजे काय हे विद्यार्थिनींना स्लाईड शोच्या माध्यमातून समजावून देण्यात आले. त्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांनींचे दोन गट करुन हवामान बदल विषयक प्रश्नमंजुषा घेण्याची आली. प्रश्नमंजुषेत सहभागी सर्व विद्यार्थिंनींना पर्यावरण विषयक पुस्तके तसेच फुलपाखरांवरील फिल्डगाईड बक्षीस म्हणून देण्यात आले वसुंधरा पर्यावरण संवर्धन अभियान तर्फे श्रीम. संगीता खरात यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली. शहरांमधील विद्यार्थीही हवामान बदलाची व्याख्या नीट सांगू शकत नाहीत असे सांगून विद्यार्थिनींच्या उत्तम सहभागाबद्दल श्रीम. संगिता खरात यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जेष्ठ शिक्षिका श्रीम. मनिषा ठाकरे यांचे उत्तम सहकार्य लाभले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft