banner

 यशवंतराव चव्हाण यांची ३२ वी पुण्यतिथी साजरी...

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कोकण विभागीय केंद्राचे वतीने स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांची ३२ वी पुण्यतिथी हातखंबा ज्युनीयर कॉलेज, रत्नागिरी येथे दि. २५ नोव्हेंबर २०१६ रोजी संपन्न झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते स्व. चव्हाण साहेबांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई कृषी व सहकार व्यासपीठ पुणे यांचे वतीने शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या 'राष्ट्रहितैषी डॉ. बाबासाहेब आंबेडकर" या निबंधस्पर्धेतील कोकण विभागातील विजेते व सहभारी शिक्षकांचा रोख रक्कम प्रमाणपत्र व ग्रंथभेट देवून सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे विजेते श्री. माधव अंकलगे व उत्तेजनार्थ सौ. सविता बर्वे यांनी मनोगत व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, कृषी व सहकार व्यासपीठ, पुणे केंद्राचे आभार मानले.
आपल्या वर्तनावरून आपले व्यक्तीमत्त्व ठरत असते. आपले व्यक्तीमत्त्व कसे घडू शकते हे चव्हाण साबेहांचे चरित्र वाचल्यानंतर समजू शकते. चव्हाण साहेबांचे विचार त्यांचा इतिहास आपल्या सर्वांना समजावा यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने विविध कार्यक्रम केले जातात. असे मा. श्री. विनायक हातखंबकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

कार्यक्रमाचे व्याख्याते श्री. इत्मियाज सिद्धीकी यांनी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे कर्तृत्व व सामाजिक जीवन उलगडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. अनेक नररत्नांमधले बहुमूल्य असे आदरणीय व्यक्तीमत्व म्हणजे यशवंतराव चव्हाण असे त्यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचा, देशाचा विकास करण्याच्या जिद्दीने पेटले होते. माझ्या माध्यमातून इथल्या सामान्य माणसाला, महाराष्ट्राचा विकास साधायला आहे हा विचार करुन त्यांनी उच्च पदावर असताना विविध धाडसी निर्णय घेतले. सिद्धीकी यांनी आपल्या व्याख्यानामध्ये विविध कवितांचा समावेश करून चव्हाण साहेबांचे कार्य, त्यांचे जीवन अतिशय सुंदररित्या विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविले.


माजी न्यायाधीश सन्मा. श्री. भास्करराव शेटे यांनी चव्हाण साहेबांचे बालपणीचे तसेच त्यांच्या वैयक्तीक आयुष्यातील काही प्रसंग सांगून वातावरण भावनीक बनवले. त्याचप्रमाणे चव्हाण साहेबांना जर समजून घ्यायचे असेल तर त्यांची पुस्तके जास्तीत जास्त वाचली पाहिजेत असेही सांगितले.

कोकण विभागीय समितीचे अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ लिमये यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की महाराष्ट्राला अग्रेसर राज्य घडविण्यात यशवंतरावांचा मोलाचा वाटा होता. राजकारणापलिकडचे नेतृत्व असल्यानेच त्यांनी साहित्य संस्कृती महामंडळ निर्माण केले. सुसंस्कृत समाजकारणी व नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व म्हणून ते सुपरिचित होते. यशवंतराव चव्हाण राज्यातील एकमेव माणस जो केंद्रात महत्वाच्या मंत्रीपदावर होता मात्र दिल्लीतील राजकारण यशवंतरावांच्या स्वभावाला मिळते जुळते नव्हते. कोकण विभागीय समितीचे सदस्य श्री. प्रकाश काणे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे जीवन विद्यार्थ्यांना समजावे यासाठी 'यशवंतराव चव्हाण जीवन प्रवाह' हे पुस्तक महाविद्यालयाला भेट म्हणून देण्यात आले
या कार्यक्रमाला कोकण विभागीय समिती उपाध्यक्ष डॉ. श्रीरंग कद्रेकर, सदस्या श्रीम. जानकीताई बेलोसे, जिल्हाध्यक्ष अभिजित खानविलकर, जिल्हा समिती सदस्य डॉ. अनिल जोशी, शहाजीराव खानविलकर, जयवंतराव विचारे, सदस्या युगंधरा राजेशिर्के, प्राची शिंदे, तसेच महाविद्यालयातील पठाण सर व इतर शिक्षकवर्ग ग्रामस्थ उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft