bannerप्रथम उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व सरस्वती मातेचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण विभागीय केंद्राचे अध्यक्ष मा. श्री. राजाभाऊ लिमये यांनी भूषविले. यावेळी वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुरेश निंबाळकर, कोकण विभागीय समिती दापोलीच्या सदस्या मा. श्री. जानकीताई बेलोसे श्री. प्रकाश काणे, सौ. युगंधरा राजेशिर्के, श्री. विश्वंभर कमळकर, वराडकर बेलोसेचे श्री. दशरथ भोसले, श्री. शिवाजी शिगवण, श्री. राजाराम कदम, श्री. कुणाल शेवरे, श्रीकांत मुंगशे, गणेश केळकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी उपस्थितांसाठी श्री. धनंजय चितळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
वराडकर बेलोसे महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. सुरेश निंबाळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री. जानकीताई बेलोसे यांनी केले. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने होणा-या कार्यकमांची माहिती दिली त्याचप्रमाणे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची थोडक्यात ओळख करुन दिली.

यानंतर शिक्षणक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. अनुक्रमे सौ. प्रिया अनिल पवार-प्राथमिक शिक्षिका, श्री. प्रमोद प्रभाकर गमरे-माध्यमिक शिक्षक व श्री. प्रशांत पंडीत जाधव - उच्च माध्यमिक शिक्षक यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे वतीने पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल धन्यवाद दिले.

ज्ञान, चारित्र्य, राष्ट्रनिष्ठा, समाजसेवा, भाषाप्रभुत्व, वक्तृत्व, नेतृत्व अशी गुणसंपदा प्राप्तीसाठी शिक्षण आता राहीले नाही. शिक्षणामुळे विद्यार्थी घडला पाहिजे हा आग्रह आता उरला नाही. सध्या शिक्षणाची घराणी अस्तंगत झाली आहेत. या सर्वांवर मात करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना श्री. धनंजय चितळे यांनी 'सध्याचे शिक्षण आणि संत वाङ्मय यावर संदर मार्गदर्शन केले. आपण इतिहास पाहिला तर आपल्याला समजेल की आपली नेतेमंडळी खूप अभ्यासक होती. आजचा विद्यार्थी निबर व कोरडा होत चालला आहे. विद्यार्थ्यांची संवेदनशीलता जागृत करण्याचे काम शिक्षकांचे आहे. शिक्षकांचाही शिष्यभाव नेहमी जागृत रहायला पाहिजे. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये मिळालेल्या मार्कांना 'गुण' न म्हणता प्राप्तांक म्हटले पाहिजे. विद्यार्थ्यांची परिस्थितीशी झुंजारची ताकद म्हणजे 'गुण' असेही त्यांनी सांगितले. 'जगावे कसे' हे शिकून घ्यायचे असेल तर दासबोध पहावा. वाचनाने अनेक सदर्भ मिळतात. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, दासबोध या ग्रंथातील काही दाखले देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन केले. काही साध्य करायचे असेल तर टी.व्ही., मोबाईल यामधून फक्त दहा मिनिटे वाचनाला दया असाही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वृत्ती निर्माण करण्यासाठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. राजाभाऊ लिमये यांनी सांगितले की विद्यार्थ्यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यासारखी विद्वत्ता मिळवावी व यशवंतराव चव्हाण साहेबांसारखे कर्तृत्वान बनावे असे आवाहन केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे यशवंतरावांच्या किर्तीमान कार्याची ओळख भावी पिढीला करून देत आहे. शिक्षकांनी युवापिढी अष्टपैलू बनवावी असे प्रतिपादन त्यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कोकण विभागीय केंद्र जिल्हा समिती रत्नागिरीचे सदस्य श्री. विश्वंभर कमळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे व शिक्षकांचे आभार मानून व पसायदान होऊन कार्यक्रम समाप्त झाला.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft