banner

औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या आयोजनामागील उद्देश :
आजपर्यंतचे जागतिक दर्जाचे सर्वोत्त्कृष्ट चित्रपट औरंगाबादच्या रसिकांपर्यंत पोहोचावेत, चित्रपट दिग्दर्शक, तंत्रज्ञ, कलावंत व युवा पिढीतील सिनेमाची आवड असणार्‍या कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळून कला व तांत्रिक पातळीवर चित्रपटाचे रसग्रहण होत चित्रपट जाणिवा अधिक सशक्त व समृद्ध व्हाव्यात, मराठवाडा व औरंगाबादचे नाव चित्रपटाच्या निर्मितीच्या अंगाने सांस्कृतिक केंद्र म्हणून व प्रोडक्शन हब म्हणून जागतिक पातळीवर पोहोचावे, औरंगाबाद शहरातील पर्यटन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यटकांपर्यंत पोहोचावे, मराठवाडा विभागातील गुणवंत कलावंतांना चित्रपट दिग्दर्शक, चित्रपट विषयातील तज्ज्ञ व तंत्रज्ञांपर्यंत पोहोचता यावे, त्यांच्यासोबत संवाद साधता यावा तसेच आताचा मराठी सिनेमा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचावा, हा या महोत्सव आयोजनामागे उद्देश आहे.

भारतीय सिनेमा स्पर्धा :
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. महोत्सवात मागील वर्षाप्रमाणे स्पर्धा गटाचा समावेश करण्यात आलेला आहे. यात विविध भारतीय भाषांतील नऊ सिनेमांचा समावेश असून पाच राष्ट्रीय पातळीवरील ज्युरी हे प्रेक्षकांसह चित्रपट पाहणार आहेत. यातील सर्वोत्त्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलासा पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचा देखील समावेश असणार आहे.

ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रेमेंद्र मुजुमदार (कोलकाता), जितेंद्र मिश्रा (दिल्ली), दार गई (युक्रेन) हे मान्यवर असणार आहेत.

फिप्रेसी ही चित्रपट समीक्षकांची आंतरराष्ट्रीय संघटना आहे. फिप्रेेसी हे जगभरातील महोत्सवांमधून उत्तम चित्रपट निवडून त्यांना पुरस्कार प्रदान करतात. त्या पुरस्कारांना आंतरराष्ट्रीय सन्मान मानला जातो आणि औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी यंदाच्या वर्षी अतिशय अभिमानास्पद बाब अशी की, या पुरस्कार निवडीसाठी फिप्रेेसीने औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची निवड केली आहे. त्यांचे तीन विशेष ज्युरी महोत्सवातील (भारतीय सिनेमा स्पर्धा गट वगळता) इतर चित्रपटांकरीता विशेष परिक्षण करणार आहेत. त्यांच्या कमिटीमध्ये व्ही. के. जोसेफ हे कमिटी अध्यक्ष म्हणून काम बघणार आहेत, तर नम्रता जोशी व रेखा देशपांडे या कमिटीमध्ये ज्युरी मेंबर म्हणून काम करतील.

उद्घाटन सोहळा :
फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन सोहळा बुधवारी, दि. 5 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहा वाजता संपन्न होणार असून या प्रसंगी प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन, ‘हेल्लारो’ या सुवर्णकमळ विजेत्या राष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह, प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, तान्हाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, महोत्सवाचे आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संचालक अशोक राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून त्याची घोषणा पुढील आठवड्यात एका विशेष पत्रकार परिषदेत करण्यात येईल. उद्घाटन सोहळ्यानंतर यंदाची राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेती गुजराथी भाषेतील फिल्म ‘हेल्लारो’ ही ओपनींग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार आहे.

समारोप सोहळा व जीवन गौरव पुरस्कार :
फेस्टिव्हलचा समारोप सोहळा रविवार, दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी सायं. 7 वाजता संपन्न होणार असून याच सोहळ्यात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपची फिल्म म्हणून ‘पॅरासाईड’ (गिसैनचुंग) (साऊथ कोरिया /2019) ही जगातील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक बोंग जून हो यांची कोरिएन फिल्म दाखविण्यात येणार आहे.

मास्टर क्लास व विशेष परिसंवाद :
महोत्सवाच्या पाच दिवसांच्या कालावधीत चित्रपट प्रदर्शनाबरोबरच विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. गुरुवार, दि. 6 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजता आयनॉक्स येथे अंदाधुन, बदलापूर या प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आलेले आहे. या मास्टर क्लाससाठी पूर्व नोंदणी आवश्यक असणार आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ज्ञानेश झोटींग, श्री. राघवन यांच्या समवेत संवाद साधतील.

गुरुवार, दि. 6 फेब्रुवारी 2020 रोजी दु. 4 वाजता ‘इतिहास व सिनेमॅटीक लिबर्टी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओम राऊत, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते प्रसाद ओक या परिसंवादात आपले विचार व्यक्त करतील तर, अभिनेते चिन्मय मांडलेकर चर्चेचे संवादक असतील.

शुक्रवार, दि. 7 फेब्रुवारी 2020 रोजी, दुपारी 12 वाजता आशय फिल्म क्लब, पुणेचे संचालक व प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सतीश जकातदार यांचे ‘महाराष्ट्राची 60 वर्षे आणि मराठी सिनेमा’ या विषयावर विशेष दृक-श्राव्य व्याख्यान आयोजित केले आहे.

शनिवार, दि. 8 फेब्रुवारी 2020 रोजी, दु. 4 वाजता ‘स्त्री दिग्दर्शक : जाणिवा
आणि दृष्टिकोन’ या विषयावर स्त्री सिने दिग्दर्शकांसमवेत विशेष परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक गौरी शिंदे, सुमित्रा भावे, अभिनेत्री व दिग्दर्शक मृणाल कुलकर्णी, प्रतिमा जोशी या आपले विचार व्यक्त करतील. प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे या मान्यवरांसोबत संवाद साधतील.

रविवार, दि. 9 फेब्रुवारी 2020 रोजी, स. 10 वाजता एमजीएम फिल्म आर्ट्स विभागात फिप्रेसी संघटनेच्या वतीने माध्यम व सिनेक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय चित्रपट समीक्षा’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

कलाकारांची उपस्थिती व संवाद :
स्पर्धा विभागातील सर्व प्रादेशिक चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ महोत्सवात उपस्थित राहणार असून त्यांच्या चित्रपटाच्या खेळानंतर ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. तसेच महोत्सवाच्या काळात डॉ. मोहन आगाशे, चित्रपट अभिनेते व कवी किशोर कदम, दिग्दर्शक समीर विद्वंस, अभिनेत्री अंजली पाटील, अभिनेता ललित प्रभाकर, लेखक अरविंद जगताप, प्रा. गणेश चंदनशिवे, दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील, दिग्दर्शक राजकुमार तांगडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवात मराठवाड्यातील लघुपट निर्मिती करणार्‍या कलाकारांसाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. या स्पर्धेला मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेतील अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या शॉर्ट फिल्म या ज्युरी कमिटीने निवडलेल्या शॉर्टफिल्म महोत्सवा दरम्यान दाखविण्यात येतील. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मला रु. 25,000 रकमेचे रोख पारितोषिक व सिल्व्हर कैलासा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

विशेष पोस्टर प्रदर्शन :
महोत्सवादरम्यान मृणाल सेन, डॉ. श्रीराम लागू व डॉ. गिरीष कर्नाड या सिनेसृष्टीतील तीन महान कलावंतांवर आधारीत विशेष पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन दि. 1 ते 9 फेब्रुवारी 2020 दरम्यान प्रोझोन मॉल येथे करण्यात येणार आहे.

चित्रपट रसग्रहन कार्यशाळा :
फिल्म फेस्टिव्हलमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा याकरिता औरंगाबाद शहरात वीस महाविद्यालयांमध्ये चित्रपट रसग्रहण कार्यशाळांचे आयोजन प्रसिद्ध चित्रपट समिक्षकांच्या उपस्थितीत दि. 25 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2020 दरम्यान करण्यात आलेले आहे.

प्रतिनिधी नोंदणी :
फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याकरीता प्रतिनिधी नोंदणीची सुरवात करण्यात आलेली असून जगातील व देशातील सर्वोत्कृष्ट सिनेमे औरंगाबादच्या रसिकांना बघता यावे, याकरीता सर्वसामान्य नागरिकांकरीता केवळ चारशे रुपये कॅटलॉग शुल्क आकारण्यात येणार आहे, तर ज्येष्ठ नागरिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात केवळ दोनशे रुपयांत या फेस्टिव्हलचा आनंद घेता येणार आहे. 18 जानेवारी पासून प्रतिनिधी नोंदणी सुरुवात होणार असून 1) आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल 2)नाथ सीड्स, पैठण रोड 3)एमजीएम फिल्म आर्टस् डिपार्टमेंट, एमजीएम परिसर 4) निर्मिक ग्रुप, व्यंकटेश मंगल कार्यालयासमोर, सुतगिरणी रोड 5) विशाल ऑप्टिकल्स, पवन गॅस एजन्सी समोर, उस्मानपुरा 6) हॉटेल स्वाद, उस्मानपुरा 7) हॉटेल नैवेद्य, सिडको बसस्टॅण्ड 8) साकेत बुक वर्ल्ड, औरंगपुरा 9) क्रियेटिव्ह हब, कॅनॉट प्लेस, बडोदा बँकेजवळ, सिडको या केंद्रांवरती चित्रपट रसिकांना प्रतिनिधी नोंदणी करता येईल.

संयोजन समिती :
औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणार्‍या या महोत्सवात मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, अजीत दळवी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे आदींनी केले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft