banner

विधी साक्षरता कार्यशाळा – हुतात्मा स्मारक, पापडी, वसई (प.)
रविवार. दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२१

IMG 20210214 WA0013

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई कायदेविषयक मोफत सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने हुतात्मा स्मारक, पापडी, वसई(प.) येथे रविवार दिनांक १४ फेब्रुवारी, २०२१ रोजी सकाळी १० ते सायं ०५.०० या वेळेत ‘विधी साक्षरता कार्यशाळा’ आयोजित केली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला हि मैत्री संस्थाचे अध्यक्ष श्री. सुरज भोईर यांच्या जागृती गीताने झाली. मनिषा खिल्लारे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीने चालणारे काम आणि विभागीय केंद्र याबद्दल माहिती दिली. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रतिमेचे पूजन करून मुख्य कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेस एकूण ८० प्रतिनिधींची उपस्थिती होती.
सर्व प्रथम उपस्थित प्रतिनिधींना भारतीय संविधानाच्या सरनाम्याचे वाटप करून सामुहिक वाचन करण्यात आले. प्रथम सत्रात श्री. विनायकराव कांबळे यांनी भारतीय संविधान आणि मानवी हक्क याबाबत माहिती दिली. यानंतर श्री. जगन्नाथ पाटील यांनी हिंदू विविः कायदा आणि महिलांचे कायदे याबद्दल माहिती दिली. ज्यामध्ये ( महिला आरक्षण, कौटुंबिक हिंसा, गर्भनिदान, हुंडाबंदी, एकाल महिला, मातृत्व प्राप्ती कायदा, भरपगारी रजा, गर्भारपणाची पूर्व आणि पश्चात सुरक्षिततेची व्यवस्था, महिला आयोग- विशाखा कमिटी, कार्यालयीन स्थळी होणारे शोषण, स्त्री समानता, समान वेतन. ) या विषयांवरील माहिती दिली.
यानंतर श्री. प्रकाश धोटकर यांनी लैंगिक शोषण आणि अत्याचार या विषयावर व्याख्यानास सुरुवात केली. ज्यामध्ये बाल लैगिक शोषण, स्त्री,पुरुष आणि तृतीयपंथी यांबाबत उल्लेख करून माहिती करून देण्यात आली. कोणाच्याही मनाविरुद्ध केलेला कोणताही जवळकीचा प्रयत्न हा वरील सदरात मोडतो. अश्लील विनोद करणे. सहज पण ज्यातून अश्लील अर्थ सूचित होउ शकतो अशी भाषा वापरणे, उगाचच स्पर्श करणे, सतत रोखून पाहणे, अप्रत्यक्षपणे शरीरसुखाची मागणी करणे, लैंगिक सुखाच्या मागणीला एखाद्या महिलेनं दिलेल्या नकारामुळे तिच्या शारीरिक, प्रतिष्ठा किंवा मालमत्तेला हानी पोहचवणं किंवा तशी धमकी देणं, त्रास देण्यासाठी एखाद्या व्यक्तीला कोणतीही आक्षेपार्ह गोष्टी सोशल प्लॅटफॉर्मवरून शेअर करणं, अशा आणि अनेक प्रकारे शोषण हे होतच असते. ह्या गोष्टी आपल्याला फक्त शारीरिक त्रास देत नसून मानसिक आणि शाब्दिक रूपाने सुद्धा आपल्यासमोर येत राहतात. ह्यासाठी तुम्ही तक्रार करू शकता आणि त्यासाठी आपल्याकडे कायदा उपलब्ध आहे. व ते कोणकोणते याबाबत सविस्तर माहिती दिली.
दुस-या सत्रात श्री. प्रॉस्पर डिसुझा यांनी सायबर क्राईम आणि कायदे यांबद्दल उपस्थितांना माहिती दिली. सायबर क्राईम प्रकार, सायबर बुलिंग, पॉर्न, इमेल, फिशिंग, डेटा थेफ, वायरस, मोबाईल, सोशल साईट, इंटररनेट अशा अनेक प्रकारे आपण सायबर क्राईम च्या जाळ्यात कसे अडकले जाऊ शकतो ह्याची अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले. व त्यानुसार कोणते कायदे आहेतआणि त्यामुळे आपण कसा आपला बचाव करू शकतो हे श्री. डिसुझा यांनी सविस्तर समजावून सांगितले.
उपस्थितांनी दिवसभराच्या व्याख्यानांवर आपले मत मांडले. कायद्यांविषयीची माहिती कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरमच्या वतीने त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी संबंधित संस्था व उपस्थितांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे विशेष आभार व्यक्त केले. ह्या नंतर कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft