यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानविषयी..
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
२५ नोव्हेंबर, १९८४ रोजी मा. यशंवतरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे हे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी यशवंतरावांचे अनुयायी, सुह्रद व कार्यकर्ते एकत्र आले. त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान हे धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष व्यासपीठ आहे. महाराष्ट्राच्या जनमानसाला सचिंत करणार्या प्रश्नांचा खल करावा आणि या चर्चेतून कार्य करणारी माणसे तयार व्हावीत, ही प्रतिष्ठानची भूमिका आहे. या राकट, कणखर, दगडांच्या देशाचा स्वाभिमान अभंग राहावा, ही महाराष्ट्रातील जनमानसाची इच्छा आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा तीन दशकांचा प्रवास हा या आकांक्षेच्या पूर्ततेचा आहे.