३. कृषी व सहकार व्यासपीठ

कृषी व सहकार विषयातील तज्ज्ञ, शेतकरी आणि या क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना एका व्यासपीठावर एकत्र आणून त्यांच्यामध्ये साधक बाधक चर्चा घडवून सकारात्मक बदल घडावा याकरिता हे व्यासपीठ कार्यरत आहे. चर्चासत्रे, मेळावे, व्याख्याने इत्यादी कार्यक्रम या व्यासपीठामार्फत आयोजित केले जातात. धोरणात्मक मुद्द्यांसोबतच शेती व सहकारासंबंधी काम करताना येणा-या अडचणी यांचा यामध्ये समावेश असतो. कृषी व सहकार व्यासपीठाचे काम पुणे कार्यालयातून चालते. श्री. अजित निंबाळकर अध्यक्ष म्हणून काम पाहतात. व्यासपीठाला श्री. अंकुशराव काकडे यांचे मार्गदर्शन लाभते. दैनंदिन कामकाज श्री. शं. त्रि. भिडे पाहत असून त्यांना प्रा. प्र. त्र्यं. पंडित, श्री. सुनिल कदम व श्री. रवि सरनाईक यांची मदत होते.

४. कायदेविषयक साहाय्य व सल्ला फोरम

समाजातील गोरगरीब, दीनदुबळे व मागास वर्गाच्या लोकांना त्यांच्या आर्थिक अपात्रतेमुळे किंवा मागासलेपणामुळे अन्याय सहन करण्याची पाळी येऊ नये यासाठी उपाय योजावेत अशा प्रकारचे मार्गदर्शन आपल्या संविधानामध्ये करण्यात आले आहे. या तरतुदीला अनुसरून भारतीय संसदेने १९८७ मध्ये विधी सेवा प्राधिकरण अधिनियम पारित केला आहे. त्या अधिनियमानुसार संपूर्ण देशामध्ये गरीब व तळागाळातील लोकांना मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला पुरविला जातो. १९८७ च्या विधी सेवा प्राधिकरण अधिनियमात अंतर्भूत असलेली मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला  योजना राबविण्याचे काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत केले जाते. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिष्ठानने "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम" या विभागाची निर्मिती केली आहे. या विभागामध्ये अंदाजे ३५ वकील व समाजसेवक काम करीत असून ते आपली सेवा या योजनेसाठी देत आहेत.

५. माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी

२१ व्या शतकास सामोरे जाण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान हे अतिशय वेगवान व प्रभावी तंत्रज्ञान साधन उपलब्ध आहे, हे आता सर्वसामान्य झालेले आहे. संगणकाचा वापर सर्वच क्षेत्रात सुरु झालेला आहे. संगणकाच्या प्राथमिक वापरापासून ते इंटरनेटपर्यंतचे शिक्षण आपल्या गरजेप्रमाणे घेणे हे आधुनिक भारतात आवश्यक झाले आहे. नवीन तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ मिळविण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञ तयार होणेही आवश्यक आहे. या दूरदृष्टीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. शरदराव पवार यांनी विश्वस्तांसमोर प्रतिष्ठानने 'माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी' स्थापन करून नवीन युवक-युवतींना संगणक प्रशिक्षणाचा लाभ देता यावा म्हणून सीडॅक, पुणे या नामवंत संस्थेचे कोर्सेस प्रतिष्ठानने सुरु करावेत, असा विचार मांडला. इतकेच नव्हेतर, महाराष्ट्रातील सर्व माध्यमिक शाळा संगणकाद्वारे प्रतिष्ठानला जोडून 'एज्युकेशन टू होम' ही योजना सुरु करण्याबद्दलही विचार मांडला. त्यास अनुसरून प्रतिष्ठानने सीडॅक, पुणे या संस्थेबरोबर ४ जानेवारी १९९९ रोजी करार करुन 'माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनी'ची स्थापना केली व पहिला डिप्लोमा इन इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (डीआयटी) ही कोर्स १० मे १९९९ रोजी सुरु झाला. ह्या माहिती व तंत्रज्ञान प्रबोधिनीचे काम श्री. सुशील गुप्तन संचालक व श्रीमती दीप्ती हेबलेकर, मुख्य विपणन अधिकारी म्हणून कुशलतेने पाहत आहेत

६. महाराष्ट्र महिला व्यासपीठ

महाराष्ट्र महिला व्यासपीठाच्या वतीने महिलांची शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक विविध दृष्टीने सक्षमता वाढावी यासाठी विविध उपक्रम, विविध कार्यशाळा आणि इतर कार्यक्रम यांच्या माध्यमातून कृतीशील प्रयत्न केले जातात. संयोजिका श्रीमती रेखा नार्वेकर, कार्यकारी संयोजिका श्रीमती ममता रमेशचंद्र कानडे महिला व्यासपीठाचे काम पाहतात.

७. नवमहाराष्ट्र युवा अभियान

नवमहाराष्ट्र युवा अभियान युवांच्या विकासाकरीता प्रयत्नशील आहे. युवांमध्ये सामाजिक, सांस्कृतिक आर्थिक आणि राजकीय सजगता आणून त्यांमधील नेतृत्वगुण विकासित करण्याकरीता नवमहाराष्ट्र युवा अभियानमार्फत विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. त्याचबरोबर विविध सामाजिक समस्यांवर नवमहाराष्ट्र युवा अभियान गेली दोन दशके कार्यरत आहे. नवमहाराष्ट्र युवा अभियान सोबत राज्यभरातून नवनवे कार्यकर्ते जोडले जात आहेत. नवमहाराष्ट्र युवा अभियानचे काम संयोजक श्री. दत्ता बाळसराफ, सहसंयोजक श्री. विश्वास ठाकूर, संघटक श्री. नीलेश राऊत पाहतात. श्री. विजय कान्हेकर आणि सहसमन्वयक श्रीमती वैशाली मोटे या समन्वयक आहेत.

८. रंगस्वर - सांस्कृतिक विभाग

प्रतिष्ठानच्या रंगस्वरतर्फे नाट्य, चित्रपट, गायन आदी कार्यक्रम होतात. रंगस्वरची वार्षिक वर्गणी पती-पत्नीसाठी रु. २०००/-, वैयक्तिक रु. १,२००/-, अपंगासाठी रु. ५००/- भरून रंगस्वरचे सभासद होता येते. रंगस्वरच्या सदस्यांना तसेच प्रतिष्ठानच्या सदस्यांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येतो. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुंबई येथील सभागृहात विविध सांस्कृतिक कार्यक्रम रंगस्वरच्या वतीने नियमितपणे सादर केले जातात. सर्व सभासद व रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश दिला जातो. रंगस्वरसाठी सभासद नोंदणी सुरु आहे

९. यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय

जगातील ज्ञानामध्ये दरवर्षी भर पडत आहे. त्यामुळे ग्रंथ, ज्ञान साधने मोठ्या संख्येने प्रसिद्ध होत आहेत. ग्रंथालयातील वाचक वर्गाचे समाधान होण्यासाठी आपण तशा प्रकारच्या ग्रंथालयातून सेवा दिल्या जातात. गेल्या वीस वर्षात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने झेप घतेली आहे. या क्षेत्रात लक्षणीय परिवर्तन झाले आहे. सध्याचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे. तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत आहे. सध्या सर्वत्र ग्रंथालयाचे व माहिती केंद्रे स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर स्थापन झाली आहेत. ती ज्ञान प्रसाराच्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शास्त्रीय व इतर संशोधनाचा वेगाने विकास होत आहे.

१०. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथील सभागृहे

प्रतिष्ठानची अद्ययावत सभागृहे आणि तेथे होणारे कार्यक्रम यामुळे यशवंतराव चव्हाण केंद्राची ओळख ही दक्षिण मुंबईमधील सांस्कृतीक, सामाजिक केंद्र अशी झाली आहे. ६५० आसनव्यवस्थेचे मुख्य सभागृह, २२५ आसनव्यवस्थेचे रंगस्वर आणि १५० आसन व्यवस्थेचे सांस्कृतिक सभागृह यांची उपलब्धता असल्यामुळे विविध प्रकारच्या कार्यक्रमांना आवश्यक सुविधा एकाच इमारतीमध्ये मिळतात.

११. शिक्षण विकास मंच

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान 2008 पासून गुणवत्तापूर्ण शिक्षणाकरीता प्रयत्नशील आहे. विविध महत्वाच्या विषयावर परिषदा, कार्यशाळा, चर्चासत्रे, शिक्षणविषयक पुस्तकांचे प्रकाशन, उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथांना पुरस्कार, शिक्षक साहित्य संमेलन, राष्ट्रीय शिक्षणदिनाचे आयोजन, शैक्षणिक महत्वाच्या विषयावर होणारी ‘शिक्षण कट्टा’ यावरील चर्चा, दत्तक शाळा, शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रशिक्षण अशा विविध पातळीवर हा मंच कार्यरत आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे शिक्षक, संस्था चालक, शासकीय अधिकारी, अभ्यासक, माध्यम प्रतिनिधी, पालक तसेच विद्यार्थी यांनी एकत्र साधक बाधक चर्चा करावी याकरीता शिक्षण विकास मंचाचे व्यासपीठ उपलब्ध आहे. शिक्षण विकास मंचच्या स्थापनेपासून डॉ. कुमुदबन्सल यांचे मार्गदर्शन उपक्रमांना लाभले. डॉ. वसंत काळपांडे शिक्षण विकास मंचचे मुख्य संयोजक म्हणून काम पाहत आहेत.

१२. अपंग हक्क अभियान

महाराष्ट्रातील अपंग व्यक्तींच्या विविध समस्या संवाद व समन्वयाच्या भूमिकेतून सोडविण्यासाठी अपंग हक्क विकास मंचाची निर्मिती करण्यात आली. मंचाच्या निमंत्रक सौ. सुप्रिया सुळे आहेत. मंचाचे संयोजक श्री. विजय कान्हेकर व श्री दत्ता बाळसराफ हे काम पाहतात. या मंचामार्फत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात शिबीराचे आयोजन करुन सर्व प्रवर्गातील अपंगांना त्यांच्या आवश्यकतेनुसार कृत्रिम अवयव व साहित्य साधनांसाठीचे मोजमाप घेऊन अपंगांना कृत्रिम अवयव व साधने मोफत उपलब्ध करून दिली जातात. तसेच या मंचामार्फत प्रत्येक अपंगांना त्यांच्या अपेक्षेनुसार योग्य ती माहिती पुरविली जाते. तसेच अपंगांना मदत करण्याचा आपल्या स्तरावरुन योग्य तो सहकार्य करण्याचा मंचाचा सतत प्रयत्न असतो. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद यांच्या सहकार्याने एडीप योजने अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व प्रवर्गातील अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साधने वाटप शिबिरांचे आयोजन करुन केले जाते

 

 

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft