आव्हानांना प्रति आव्हान देणारा समाज निर्माण झाला पाहिजे– प्रा.आनंदराव जाधव
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या परिसंवादात मान्यवरांचे मत
मुंबई दि. १४ : प्रत्येक काळात आव्हाने असतातच. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळीही खुप मोठी आव्हाने होती. यशवंतराव चव्हाणांकडे महाराष्ट्राचे नेतृत्व होते.सन १९५७ ते १९६० हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. महाराष्ट्राच्यासमोर पैसा, शिक्षण, दारिद्र्य अशी अनेक आव्हाने होती. यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे उत्तुंग काम केले. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत यासाठी ईबीसी सवलत मंजूर केली. राजकारणात तोच टिकून राहतो, जो आव्हाने पेलतो. राजकारणामध्ये सगळ्यांना सगळंच करावं लागतं, पण मिळवलेली सत्ता कोणासाठी वापरायची हे ज्याला कळलं तोच यशस्वी राज्यकर्ता ठरतो असं ते म्हणत. विरोधकांनाही सन्मान देणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता. विरोधी पक्षातील भाई उद्धवराव पाटील सभागृहात मत व्यक्त करताना सत्ताधारी सुद्धा शांत बसत. परंतु हल्ली सभागृहात लोकप्रतिनिधी दंगा करताना दिसतात, आपण का दंगा करतो आहोत हे देखील त्यांना समजत नाही. केवळ दंगा करणे म्हणजे आव्हानाला तोंड देणे नव्हे, तर आव्हानांना प्रतिआव्हान देणारा समाज निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते, माजी उपप्राचार्य प्रा. आनंदराव जाधव यांनी व्यक्त केले.
Read more: आव्हानांना प्रति आव्हान देणारा समाज निर्माण झाला पाहिजे– प्रा.आनंदराव जाधव
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र, लातूरच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०७ व्या जयंतीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्राची जडणघडण आणि यशवंतराव चव्हाण यांचे योगदान’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार, माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे हे उपस्थित होते. तर परिसंवादातील वक्ते म्हणून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद येथील निवृत्त उपप्राचार्य प्रा. आनंद जाधव व तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापुर येथील मराठी विभाग प्रमुख मा. प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख हे उपस्थित होते.
परिसंवादातील दुसरे वक्ते प्रा. डॉ. शिवाजीराव देशमुख म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीत पायाच मुळात यशवंतराव चव्हाण यांनी रचना. त्यावरच आजचा हा डोलारा उभा आहे. हरिजनांबद्दल त्यांना प्रचंड जिव्हाळा होता. सर्व सामाजिक स्तरावर त्यांची निष्ठा होती. ग्रामीण भागापर्यंत ग्रंथालय योजना, कोयना, उजनी सारखे प्रकल्प उभारणी, सहकारी कारखाने, उद्योगधंदे, रंगभूमी तमाशा- लोककला, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये यशवंतरावांचं योगदान अनन्यसाधारण आहे. मराठवाड्यावरही यशवंतरावांचे खूप प्रेम होते. मराठवाडा ही ज्ञानाची ज्ञानपोई व्हावी असे त्यांना वाटत होते. या उद्देशातूनच त्यांच्या कार्यकाळात मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. महाराष्ट्र जो उभा आहे तो यशवंतरावांचे विचारावरच आहे. प्रत्येक माणसाला नावानी ओळखणार्या लोकनेता म्हणजे यशवंतराव चव्हाण असे विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
भावपूर्ण आदरांजली
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र, लातूरचे सचिव, ज्येष्ठ समाजसेवक, एक नाट्य् कलावंत, समाजहृदयी शिक्षक, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व श्री.हरिभाऊ जवळगे यांचे आज पहाटे २:३० वाजता प्रदिर्घ आजाराने दु:खद निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने ते पिडीत होते. ते ७४ वर्षाचे होते. त्यांचा अंत्यविधी आज दि.२४:०७:२०१८ रोजी दुपारी ठिक २:०० वाजता 'मंगरुळ' ता. औसा जि. लातूर याठिकाणी करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले डॉ.रवि व राहुल ,स्नुषा व नातवंडे आहेत. (टिप- मंगरुळ हे गाव किल्लारी पासुन पश्चिमेकडे ८ कि.मी.अंतरावर आहे.) शोकाकुल विवेक सौताडेकर, कोषाध्यक्ष- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र, लातूर.