मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त व्याख्यान संपन्न

मराठी भाषेविषयी प्रत्येकाने संवेदनशील असण्याची गरज

                                                                                - स्वानंद बेदरकर

WhatsApp Image 2020 01 11 at 5.45.42 PM 1

नाशिक (दि. ११) : आज मराठी भाषेच्या वापराबाबत समाज पुरेशा प्रमाणात संवेदनशील नसून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकमुळे भाषेचा नेमका आणि अर्थवाही वापर करणे लोक विसरत आहेत आणि त्यातून संवाद, आत्मीयता, आपलेपणा हरवून जात आहे. चिन्हांची भाषा उदयास येत असून व्यक्त होण्यासाठी अशा प्रकारची माध्यमे तोकडी ठरत आहेत. त्यासाठी मराठी भाषेच्या परंपरेकडे,साहित्याकडे, पुन्हा जाणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक स्वानंद बेदरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त स्वानंद बेदकर यांच्या वैभव मराठीचेया विषयांवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट,नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन यांचे सहकार्य लाभले.
श्री. बेदरकर म्हणाले की, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत सावता माळी, रामदास स्वामी या थोर संतांनी लिहिलेले अभंगाच्या रूपातले अक्षरसाहित्य सर्वांच्या जीवनाला मार्गदर्शक आहे. संत नामदेवांनी नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ तून भाषेचा वापर जनप्रबोधनासाठी केला. ती शिदोरी आपले संचित आहे. शाहिरी कवितेने भाषेचा नाद आणि सौदर्य बहाल केले. कवी केशवसूत, मर्ढेकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ यांनी आपल्या कवितांतून काळावर भाष्य केले. भाषिक संक्रमण, घुसळण होऊन नवी भाषा नवा विचार देणारी ठरली. लोकसाहित्यातून आलेली भाषा आणि आजची भाषा यांचा संयोग होऊन एक समृद्ध मराठी भाषा समोर आली आहे. आजच्या पिढीने, तरूणांनी सकस साहित्याचे वाचन करावे. यांच्या भाषेचा अभिमान ठेवावा व मराठी भाषा जगवण्यासाठी व जागवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले.

फ्यूजन- २०१९ संगम सप्तकलांचा...

सप्तकलांच्या अविष्कारातून रसिकांना नववर्षाची सुरेल भेट

WhatsApp Image 2020 01 01 at 2.25.50 PM 1

नाशिक (दि. ३१) : सरत्या वर्षाची सायंकाळ आणि सूरांची बरसात यांचा अनोखा मेळ जीवन जगण्याचे बळ व सकारात्मक जाणिवांचे आनंदी चांदणे बरसून गेले. प्रत्येक रसिकाने मनात सूरांची आठवण काळीजकुपीत आणि हृदयात निश्चित जपून ठेवली असेल. निमित्त होते नववर्षाच्या पूर्वसंध्येला नव्या संकल्पांची नवी मैत्री,नवी ओळख आनंदाची जाणीव असलेल्या नवीन वर्षाची सुरुवात ही थोड्याशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने व्हावी, याकरीताच नववर्षाच्या पूर्वसंध्येला काही चांगले संकल्प घेऊन नवीन वर्ष आपण सर्वच एका वेगळ्या प्रकारे साजरा करावा या संकल्पनेतून विश्वास ग्रृप,विश्वास संकल्प आनंदाचा उपक्रमातंर्गत फ्यूजन-२०१९ संगम सप्तकलांचा...या अनोख्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
सांज सुरांची आठवण, सांज ये गोकुळी या गीतातून अलगद चालत आली आणि त्यानंतर सूर संगीत, ताल यांची अनोखी अनुभूती रसिकांना अमृतानुभव देऊन गेली. नृत्य, लावणी, भावगीत, समुहगीत, त्याचबरोबर शिल्पकला, चित्रकला यांचा अनोखा मिलाप जीवनाचे फ्यूजन कसे सुंदर आकाराला येते याचे दर्शन घडविणारे होते. लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, अधिर मन झाले, चांदणं-चांदणं झाली रात..., वेडात मराठे वीर दौडले सात..., पाहिले नं मी तुला.. तु मला.., वार्‍यावरती गंध पसरला नाते मनाचे..., आम्ही ठाकरं ठाकरं..., लिंबोगाचा डोंगर..., श्रावणाचं ऊन मला झेपेना.., उगवली शुक्राची चांदणी... अशा एकाहून एक सरस गीतांतून मैफिलीला रंग चढत गेला. हिंदी, मराठी गीतांमधला आशय आणि त्यातून मिळणारा संगितानुभव भारतीय चित्रपट संगीताचा सुरमयी प्रवासच होता. याद किया दिल ने कहाँ हो तुम..., आजी रूठ के अब कहाँ जायीगा..., अभी ना जाओ छोडकर अशा गीतांमधली नजाकत जीवनावरचं प्रेम आणि आशयाचं दर्शन घडविणारे होते. सचिन शिंदे दिग्दर्शित विनोदी नाट्यप्रवेशाने रसिकांना नाट्यानुभवाची अनोखी हास्यानुभूती दिली. जीवनातल्या रोजच्या विसंगतीवर त्यातून नेमके बोट ठेवले.

   

 विभागीय केंद्र - नाशिक

 मा. श्री. विनायकराव पाटील
 
अध्यक्ष विभागीय केंद्र, नाशिक
 मा. श्री. विश्वास ठाकूर (कार्याध्यक्ष)
 श्री. डॉ. कैलास कमोद, सचिव

 आनंदवल्ली, दुसरा मजला,
 गंगापूर पोलीस स्टेशन,
 सावरकर नगर, गंगापूर रोड
 नाशिक- ४२२०१३
 कार्यालय : ०२५३ - २३४४५४५ / ९८२२७५००३३
 ईमेल : vinayakpatilnsk@gmail.com

   

वृत्तपत्रीय दखल (नाशिक)  

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft