१०वा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
स्मिता पाटील यांच्या अभिनयात प्रचंड सामर्थ्य : विद्या बालन

WhatsApp Image 2020 01 19 at 7.37.02 PM

स्मिता पाटील यांच्या अभिनयात एवढी ताकत होती की, संभाषण न करताही त्यांच्यातील भावमुद्रावरून आपल्याला त्यांच्या भावना समजत होत्या, त्या काळी सोशल मिडिया नसतानाही त्यांना मिळालेली लोकप्रियता ही त्यांच्यातील अभिनयाचे सामर्थ्य सिद्ध करते, अशा अभिनेत्री दुर्मिळ आहेत, असे विचार ज्येष्ठ अभिनेत्री विद्या बालन यांनी १०व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्ता आयोजित स्मिता पाटील यांच्यावरील स्मृती कार्यक्रमात बोलताना सांगितले. यावेळी महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्यांच्याशी संवाद साधला. चित्रपटसृष्टीत वावरताना आपल्याला प्रत्येक गोष्टींचे सूक्ष्म बारकावे समजून घ्यावे लागतात,हा एक निरंतर अभ्यासू वृत्ती जोपासण्याचा प्रकार आहे. त्यासाठी खूप मेहनतदेखील आवश्यक आहे. वेगवेगळ्या भाषांमध्ये,वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट करताना आपल्यातील कौशल्याचा कस लागतो. त्यासाठी तितक्या ताकदीने आपण काम केले तर रसिकांपर्यंत आपले विचार व तो प्रसंग पोहचविणे शक्य होते. आजच्या जमान्यात रसिकवर्ग देखील अधिक प्रगल्भ आहे. चर्चादेखील मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे इतकी वर्षे होऊनसुद्धा आपण स्वतःला अपडेट ठेवत असतो. हे प्रत्येक कलाकाराने ठेवलेच पाहिजे, असेही विद्या बालन यांनी सांगितले.
कलाकारांचे जीवन ग्लॅमरस वाटत असले तरी त्यामागे खडतर मेहनत आहे,अनेक प्रवास,खाण्यापिण्याबाबत करावी लागणारी तडजोड तसेच खासगी आयुष्यावर येणारे निर्बंध याची जाणीव अनेकदा इतरांना नसते. त्यामुळे हे क्षेत्र अधिक आव्हानात्मक आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणा-यांनी या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे,या मुद्द्यावर भर देताना त्यांनी आपल्या चित्रपट प्रवासातील अनेक आठवणी तसेच किस्से सांगितले. त्याचबरोबर आलेल्या अनेक आव्हानांतून कसे सामोरे गेलो,याचाही ऊहापोह केला.

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन;
शर्मिला टागोर यांचा विशेष गौरव....


IMG 20200117 WA0048


भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास गौरवशाली आहे. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचीही मोठी परंपरा असून त्यात प्रामुख्याने सामना, सिंहासन, जैत रे जैत, उंबरठा असे सिनेमे जब्बार पटेल यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न भारतीय दिग्दर्शकांनी सिनेसृष्टीला देऊन हे क्षेत्र समृद्ध केले तसेच जगात लौकिक वाढवला आहे, असे विचार यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १०व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. या महोत्सवात सिनेसृष्टीतील विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या ख-या अर्थाने आजही `सपनों की रानी' असून त्या ज्या राज्यातून आहेत, त्या पश्चिम बंगालने वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक मान्यवर दिले असून देशाच्या विकासात मोलाचे योगदान आहे, असेही विचार त्यांनी व्यक्त केले.भारतीय सिनेमा क्षेत्रात वावरताना चांगले दिग्दर्शक मिळाले, त्यामुळे अभिनय शिकता आला तसेच ह्या क्षेत्राने खूप मानसन्मान मिळवून दिला, त्यामुळे आपण खूप समाधानी आणि आनंदी आहोत, असे उद्गार शर्मिला टागोर यांनी काढले तसेच हा मनाचा पुरस्कार दिल्याबद्दल यशवंतराव चव्हाण सेंटर बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
चित्रपट महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी या महोत्सवामागील भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस शरद काळे यांनी केले. या कार्यक्रमास सिनेक्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होती. या महोत्सवात २३जानेवारी २०२०पर्यंत विविध वर्गवारीतील सुमारे ६५चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. भारत, चीन, रशिया, फ्रान्स, इराण, बेल्जियम, अर्जेंटिना, इस्त्रायल,तुर्की आदी देशांतील चित्रपट एकाच ठिकाणी पाहण्याची सुवर्णसंधी सर्वासाठी यशवंत चित्रपट महोत्सवाने उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी दिली.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft