देवराष्ट्रे येथील स्मारकाचे पालकत्व..
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागामार्फत मा. यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे, तालुका कडेगांव, जिल्हा सांगली येथील जन्मघर प्राचीन व ऐतिहासिक स्मारक असल्याचे घोषित केलेले आहे. या स्मारकाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईने महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संरक्षण योजने अंतर्गत पालकत्व घेण्याबाबत शासनाच्या पुरातत्व विभागाकडे विनंती केली. त्यानुसार पुरातत्व विभाग व यशवंतराव चव्हान प्रतिष्ठान, मुंबई यांचेमध्ये दिनांक ११ मार्च २०१३ रोजी करार झालेला आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून पुरातत्व विभागाच्या निवड समितीवर असलेल्या वास्तुविशारद यांचेकडून आराखडा मागविण्यात आला होता. त्यानुसार मे. गजबर अॅन्ड असोसिएटस यांना आराखडा तयार करण्याबाबत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये सर्वसाधारण मा. यशवंतरावांच्या जन्मापासून ते उप-पंतप्रधान काळापर्यंतच्या कालावधीची छायाचित्रे लावण्यात आली असून तेथे मा. चव्हाणसाहेबांची भाषणे ऐकविण्यात येत आहेत. या ऐतिहासिक स्मारकाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष. मा. शरदराव पवार यांच्या हस्ते दि. २६ जून २०१४ रोजी झाले.