कायदेविषयक साहाय्य व सल्ला फोरम

समाजातील गोरगरीब, दीनदुबळे व मागास वर्गाच्या लोकांना त्यांच्या आर्थिक अपात्रतेमुळे किंवा मागासलेपणामुळे अन्याय सहन करण्याची पाळी येऊ नये यासाठी उपाय योजावेत अशा प्रकारचे मार्गदर्शन आपल्या संविधानामध्ये करण्यात आले आहे. या तरतुदीला अनुसरून भारतीय संसदेने १९८७ मध्ये विधी सेवा प्राधिकरण अधिनियम पारित केला आहे. त्या अधिनियमानुसार संपूर्ण देशामध्ये गरीब व तळागाळातील लोकांना मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला पुरविला जातो.

१९८७ च्या विधी सेवा प्राधिकरण अधिनियमात अंतर्भूत असलेली मोफत कायदेविषयक सहाय्य व सल्ला  योजना राबविण्याचे काम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमार्फत केले जाते. या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रतिष्ठानने "यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम" या विभागाची निर्मिती केली आहे. या विभागामध्ये अंदाजे ३५ वकील व समाजसेवक काम करीत असून ते आपली सेवा या योजनेसाठी देत आहेत.

फोरममार्फत सर्वसाधारणपणे खालील प्रकारची कामे केली जातात

•  समाजातील गोर-गरीब व तळागाळातील लोकांना कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता मोफत तोंडी सल्ला  देणे.
•  प्रसंगी गुंतागुंतीच्या प्रश्नांसंबंधी सखोल अभ्यास करून गरजू लोकांना कायदेविषयी सल्ला देणे.
•  काही वेळा पत्रव्यवहारद्वारे गरजू लोकांना कायदेविषयी सल्ला देणे.
•  पक्षकाराच्या तंटयामध्ये सामोपचाराने तडजोड घडवून आणणे.
 •   विधी विषयामध्ये संशोधन करून प्रचलित कायद्यांमध्ये सुधारणा सूचविणे किंवा नवीन कायद्याचे प्रारूप तयार करून वैधानिक प्रस्ताव राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला पाठविणे.
•   सर्वसामान्य लोकांना वेळोवेळी कायद्यांची विशेष माहिती करून देण्यासाठी तज्ज्ञांची विशेष व्याख्याने आयोजित करणे.
•   सामान्य लोकांना कायद्यांची माहिती करून देण्यासाठी वरचेवर विधी साक्षरता (Legal Awareness ) कार्यशाळांचे आयोजन करणे.
•   विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मूट कोर्ट स्पर्धा, निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा यांचे आयोजन करणे. तसेच अशा विद्यार्थ्यांसाठी वकिलांची व्यावसायिक नीतिमत्ता या विषयावर परिसंवादांचे आयोजन करणे.
•  संबंधित न्यायालयाच्या सहकार्याने व त्यांच्या संयुक्त विद्यमाने त्या न्यायालयामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणामध्ये तडजोड घडवून आणण्यासाठी लोक अदालतचे आयोजन करणे.
•  न्यायालयामध्ये मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी प्रयत्न करणे.

फोरमच्या बैठका 
कायदेविषयक सहाय्य व सल्ला योजनेच्या अंमलबजावणीबाबत विचार करुन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, झालेल्या कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी, पुढील कार्यक्रमांची आखणी करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दरमहा दुस-या शुक्रवारी फोरमच्या मासिक बैठका घेतल्या जातात. या बैठकांना फोरमचे जास्तीत जास्त सदस्य उपस्थित राहतात.

फोरमच्या उपसमित्या 
एखाद्या विषयासंबंधी सखोल अभ्यास करून प्रस्ताव तयार करण्यासाठी वेळोवेळी फोरमच्या वेगवेगळया उपसमित्या नेमल्या जातात व आवश्यकतेनुसार त्यांच्या बैठका घेतल्या जातात.

कायदेविषयक सल्ला केंद्र
गोरगरीब व सामान्य लोकांना कायदेविषयक तोंडी सल्ला देण्यासाठी दर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता चव्हाण केंद्राच्या दुस-या मजल्यावर प्रतिष्ठानच्या ग्रंथालयामध्ये कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र चालविले जाते.

मोफत समुपदेशन व तडजोड केंद्र
दर मंगळवारी सायंकाळी ५.०० ते ७.०० या वेळांत समुपदेशन व समेट केंद्राचे आयोजन केले जाते. दोन वादग्रस्त पक्षकारांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न या केंद्रामध्ये केला जातो.
 
आपल्या कायद्याची माहिती करून घ्या. (Know Your Law Lecture Series 
या व्याख्यानमाले अंतर्गत दरमहा किंवा तीन महिन्यातून एकदा कायदेपंडितांचे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते.

वकीलांची व्यावसायिक नीतीमत्ता या विषयावर चर्चासत्र
विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात. त्यापैकी वकीलांच्या व्यावसायिक नीतिमत्ता (Professional Ethics of Lawyers ) या विषयाबाबत नवीन होतकरू वकीलांना जाणीव करुन देण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले जाते.

विधी साक्षरता कार्यशाळा 
लोकांना सामाजिक किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधीत असलेल्या कायद्यांची माहिती करुन देण्यासाठी विविध प्रकारच्या विधी साक्षरता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळे प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ : पौगंडावस्थेतील मुले व मुली, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे सदस्य, सार्वजनिक न्यायाचे विश्वस्त, सार्वजनिक संस्थांचे सदस्य आणि सर्वसामान्य जनता इत्यादी. या घटकांसाठी विधी साक्षरता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

   

विधी सल्लागार व सदस्य सचिव  

श्री. म. बा. पवार
विधी सल्लागार व सदस्य सचिव,
कायदेविषयक सहाय्य व सल्ला फोरम,
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- ०२२-२२०२८५९८ / ०२२-२२८५२०८१


   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft