दया पवार पुरस्कार पद्मश्रीपेक्षाही मोठा - सयाजी शिंदेपद्मश्री दया पवार यांच्या नावे मिळालेला हा पुरस्कार पद्मश्रीपेक्षाही मोठा वाटतो' असे म्हणत अभिनेते सयाजी शिंदे यांनी दया पवार स्मृति पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या. सयाजी शिंदे यांच्यासोबत लेखक- कवी आनंद विंगकर, लेखक राहुल कोसंबी यांना २३ व्या दया पवार स्मृति पुरस्काराने यावेळी सन्मानित करण्यात आले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात हा सोहळा रंगला.

दया पवार यांच्या 'बलुतं' या आत्मकथनाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने एकदिवसी संमेलनाचेही आयोजन करण्यात आले होते. पद्मश्री दया पवार यांचे 'बलुतं' १९७८ मध्ये प्रकाशित झाले. 'बलुतं'चा त्यावेळचा प्रवास नेमका कसा होत गेला या विषयावर आधारित 'बलुतंची चाळिशी' या परिसंवादात ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल, डॉ. रावसाहेब कसबे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे त्या काळातले 'बलुतं'चे साक्षीदार सहभागी झाले होते. या परिसंवादातून त्यांनी ४० वर्षांपूर्वीचा काळ आणि दया पवार यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा पट उलगडला. तर 'बलुतं'नंतरच्या नव्वदोत्तरी साहित्याचा आढावा घेण्यासाठी 'समकालीन दलित साहित्य : साचलेपण की विस्तार?' या दुसऱ्या परिसंवादामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राहुल कोसंबी, कवी सुदाम राठोड, प्रा. धम्मसंगिनी रमागोरख या मान्यवरांनी आपले विचार मांडले.

'बलुतं'च्या चाळीशीनिमित्त ग्रंथालीकतर्फे या वर्षीपासून 'बलुतं' पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली. उपेक्षित समाजातून येणार्‍या लेखकाच्या आत्मकथनाला ग्रंथालीच्या वतीने दर वर्षी हा ' बलुतं पुरस्कार' देण्यात येणार आहे. आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्या नजुबाई गावित या पहिल्या वहिल्या ' बलुतं पुरस्कारा'च्या मानकरी ठरल्या. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते नजुबाईंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft