'बलुतं'च्या चाळीशी निमित्त एकदिवसीय संमेलन 
अभिनेता सयाजी शिंदे, राहुल कोसंबी आणि आनंद विंगकर हे लेखक यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्काराचे मानकरी

मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या दया पवार यांच्या ‘बलुतं' या आत्मकथनाला यंदा ४० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे पद्मश्री दया पवार प्रतिष्ठान, ग्रंथाली वाचक चळवळ आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने "बलुतं'ची चाळिशी या संकल्पनेभोवती २० सप्टेंबर रोजी एकदिवसीय संमेलन आयोजित करण्यात आले आहे. याच संमेलनात दया पवार स्मृती पुरस्कार २०१८चे वितरण होणार असून अभिनेता सयाजी शिंदे यांच्यासह राहुल कोसंबी आणि आनंद विंगकर हे लेखक यंदाच्या दया पवार स्मृती पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. अकरा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे दया पवार स्मृती पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात गुरुवार २० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.००पर्यंत होणाऱ्या या एकदिवसीय संमेलनात मान्यवर लेखक-कवी-कलावंतांच्या सहभागासह परिसंवाद, चर्चासत्रे, कवी संमेलन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. शरद काळे (विश्वस्त, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सकाळी १० वाजता आयोजीत परिसंवादाचे अध्यक्ष दिनकर गांगल असतील. तर होणा-या परिसंवादात डॉ. रावसाहेब कसबे, सुशीलकुमार शिंदे आणि रामदास फुटाणे इत्यादी मान्यवर सहभागी होणार आहेत. परिसंवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करतील. 


दुपारी दीड वाजता दलित साहित्य : साचलेपण की विस्तार?' या विषयावर परिसंवाद होणार असून या परिसंवादाचे अध्यक्ष राहुल कोसंबी असून सुदाम राठोड, प्रा. सतीश वाघमारे आणि धम्मसंगिनी रमागोरख इत्यादी मान्यवर सहभागी होतील.

सायंकाळी ४ वाजता 'बाई मी धरण बांधिते' दया पवार यांच्या गाजलेल्या कवितांचे सादरीकरण सौमित्र आणि प्रा. प्रज्ञा दया पवार इत्यादी मान्यवर करतील. कार्यक्रमाचा समारोप आ. हेमंत टकले (कोषाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई) करतील.

"बलुतंची चाळीशी' वर परिसंवाद १९७८ साली पद्मश्री दया पवार यांचे ‘बलुतं' प्रकाशित झाले आणि मराठी साहित्य विश्व या पहिल्यावहिल्या दलित आत्मकथनाने ढवळून निघाले. ‘बलुतं'चा त्यावेळचा प्रवास नेमका कसा होत गेला या विषयावर आधारित "बलुतंची चाळिशी' या परिसंवादात ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल, डॉ. रावसाहेब कसबे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे त्याकाळातले ‘बलुतं'चे साक्षीदार सहभागी होणार आहेत. तर ‘बलुतं'नंतरच्या नव्वोदत्तरी साहित्याचा आढावा घेण्यासाठी ‘समकालीन दलित साहित्य : साचलेपण की विस्तार?' या आणखी एका परिसंवादामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार विजेते राहुल कोसंबी, कवी सुदाम राठोड, समीक्षक प्रा. सतीश वाघमारे आणि प्रा. धम्मसंगिनी रमागोरख आदी मान्यवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

"बाई मी धरण बांधिते' "बाई मी धरण बांधिते... माझं मरण कांडिते' ही दया पवारांची कविता फक्त कविताच राहिली नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक सामाजिक चळवळींचे ते एक लोकगीत ठरले. या कवितेसह ‘कोंडवाडा' आणि ‘पाणी कुठवर आलं ग बाई' या दया पवारांच्या गाजलेल्या कवितासंग्रहातील काही निवडक कवितांचे सादरीकरण यावेळी सौमित्र आणि डॉ. प्रा. प्रज्ञा दया पवार करणार आहेत.

२३ वा दया पवार स्मृती पुरस्कार पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे गेल्या २२ वर्षांपासून साहित्यिक-सामाजिक, सांस्कृतिक चळवळीतील विविध मान्यवरांना दया पवार स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदा हा पुरस्कार सयाजी शिंदे, राहुल कोसंबी आणि आनंद विंगकर यांना जाहीर झाला आहे. या समारंभात पुरस्कार विजेत्यांच्या एकूणच कारकिर्दीचा "चला हवा येऊ द्या' फेम अरविंद जगताप, समीक्षक प्रा.उदय रोटे आणि युवा पत्रकार शर्मिष्ठा भोसले आढावा घेणार आहेत.

सयाजी शिंदे : अभिनेता, लेखक, कवी, नाटककार म्हणून परिचित असलेल्या सयाजी शिंदे यांचे सामाजिक कार्यदेखील तितकेच अभिनंदनीय आहे. सयाजी शिंदे यांचा सह्याद्री देवराई प्रकल्प आज राज्यातील अनेक दुष्काळी भागात वृक्षारोपणचे काम करीत आहे. सयाजी शिंदे यांच्या मुक्तछंदातील ‘तुंबारा' या काव्य-नाट्य प्रयोगाची जाणकारांनी चांगली दखल घेतली होती.

राहुल कोसंबी : "उभं आडवं' या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्राप्त झालेले राहुल कोसंबी सध्या दलित मध्यमवर्ग या विषयावर संशोधन करीत आहेत. नॅशनल बुक ट्रस्टच्या मराठी आणि कोकणी विभागाची संपादकीय जबाबदारी त्यांनी गेली अनेक वर्षे सांभाळली असून साहित्य, संस्कृती, दलित अत्याचार अशा विविध विषयांवर कोसंबी यांनी विपुल लेखन केले आहे. विद्यार्थी असताना त्यांनी लोकवांड्मय गृहामध्ये ग्रंथनिर्मिती, संपादन याचा अनुभव घ्यायला सुरुवात केली आणि सध्या ते ‘मुक्त शब्द' या मासिकाचे संपादकीय सल्लागार आहेत.

आनंद विंगकर : परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीने नाडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे सनातन दु:ख मांडणाऱ्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' या कादंबरीने आनंद विंगकर यांना चांगलाच नावलौकिक मिळवून दिला. याच कादंबरीसाठी त्यांना प्रतिष्ठेचा केशवराव कोठावळे पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ता आणि कवी म्हणून परिचित असलेल्या विंगकर यांचा ‘आत्मटिकेच्या उदास रात्री' आणि ‘सुंबरान मांडलं' हे कवितासंग्रह प्रकाशित झाले असून अलिकडेच दुष्काळी माणदेशात फिरून रिपोर्टवजा ललित लेखांवर आधारित ‘माणदेश : दरसाल दुष्काळ' हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

आतापर्यंत पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे शरणकुमार लिंबाळे, डॉ. गंगाधर पानतावणे, विठ्ठल उमप, डॉ. जब्बार पटेल, कुमुद पावडे, केशव मेश्राम, प्रकाश खांडगे, प्रेमानंद गज्वी, उत्तम कांबळे, हरी नरके, दिनकर गांगल, विलास वाघ, ज्योती लांजेवार, रामदास फुटाणे, निरजा, आनंद पटवर्धन, समर खडस, वामन होवाळ, वामन केंद्रे, भीमराव पांचाळे, हिरा बनसोडे, सुबोध मोरे, अरुण शेवते, रमेश शिंदे, रझिया पटेल, संभाजी भगत, उर्मिला पवार, जयंत पवार, लक्ष्मण गायकवाड, उल्का महाजन, संजय पवार, सुषमा देशपांडे, मधू कांबीकर, चित्रकार श्रीधर अंभोरे, संतोष खेडलेकर, लोकनाथ यशवंत, नागराज मंजुळे, भीमसेन देठे, प्रतिमा जोशी, सुधारक ओलवे, गणेश चंदनशिवे, वीरा राठोड, शिल्पा कांबळे, सुधीर पटवर्धन आदी मान्यवरांना दया पवार स्मृति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे   

नवमहाराष्ट्र युवा अभियान संपर्क  

श्री. दत्ता बाळसराफ, कार्यक्रम व्यवस्थापक
यशवंतराव चव्हाण केंद्र,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट,
मुंबई-४०००२१
दूरध्वनी क्रमांक- २२८१७९७५ , २२०४३६१९

   

 Follow us :       

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft