crear sitio web con WordPress


डॉ. रवींद्र थत्ते, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘ग्रंथाली’चे दिनकर गांगल, लेखिका मीना गोखले, माजी मंत्री अरुण गुजराथी, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल प्रतिष्ठानचे सरचिटणीस अध्यक्ष शरद काळे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

राजकीय, सामाजिक प्रश्नांची आखणी करताना त्यामागील इतिहास व साहित्यप्रवाहाचा व्यासंगपूर्ण अभ्यास असणाऱ्यांमध्ये साधू यांचे नाव अग्रभागी होते. मराठी साहित्यात वैविध्यपूर्ण लेखन करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांत साधू यांचा समावेश होतो, असे सांगून डॉ. जब्बार पटेल यांनी ‘सिंहासन’ चित्रपटाच्या वेळेस अरुण साधू यांच्यासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. तर प्रा. मीना गोखले म्हणाल्या, अरुण साधू यांच्या निवडक कथांचे संपादन करताना लेखक आणि माणूस म्हणून जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांचे लिखाण ‘लोकल ते ग्लोबल’ अशा स्वरुपाचे होते. त्यांना कवितेचीही विशेष आवड होती.

‘‘पत्रकारितेत सत्य किती सांगायचे यात मोठी आडकाठी असते. अशावेळी सत्याला कल्पनेच्या कोषात गुंडाळून मांडण्याचा कलात्मक मार्ग अरुण साधू यांनी पुढच्या पिढीला दाखविला’’, असे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर म्हणाले.

लढणाऱ्या व्यक्तींबद्दल साधू यांना अतिशय आदर व आस्था होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या लेखनातून न्याय दिला नाही अशी खंत त्यांना कायम वाटत होती. ती कमतरता त्यांनी डॉ. जब्बार पटेलांच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण केली. कलेचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व जपणारा, कथा, कांदबरी, नाटक, एकांकिका या सहित्यप्रकारात चाकोरीबाहेरच्या वाटा चोखाळणारा अरुण साधू पुन्हा होणे नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी साधू यांना श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘असा साधू होणे नाही’ ही साधू यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. या कार्यक्रमास साधू यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft