७ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात
७५ चित्रपट दाखवले जाणार..यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पुणे फिल्म फाऊंडेशन, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २० ते २६ जानेवारी दरम्यान करण्यात आले आहे अशी माहिती महोत्सवाचे संचालक जब्बार पटेल यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली.

यंदा महोत्सवाचे हे 7 वे वर्ष असून, या महोत्सवात मुंबई विद्यापीठाचे अधिक सहकार्य असणार असून, कुलगुरु संजय देशमुख हे उद्धाटनाला उपस्थित राहतील अशी माहिती सरचिटणीस शरद काळे यांनी दिली. यंदाच्या चित्रपट महोत्सवात जगभरातील एकूण ७५ सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. तसेच यावर्षी स्मिता पाटील स्मृति व्याख्यानमालेसाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर व्याख्याते असणार आहेत.

चित्रपट यावर्षी ५२ जागतिक, ३ भारतीय, ३ मराठी, ४ रेट्रो, ७ लेटिन अमेरिका या भाषेतील चित्रपट असणार आहेत. विद्यार्थयानी तयार केलेल्या २९ लघुपट यामध्ये १३ चलचित्र तर १६ एनिमेशन आहे. तसेच व्हिएतनाम देशाचे ५ सिनेमे देखील दाखवण्यात येणार आहेत असे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितले. यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे समन्वयक व्यवस्थापक संजय बनसोडे ही उपस्थित होते

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी गिरवले चित्रपट समीक्षणाचे धडे

यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा स्तुत्य उपक्रम- कुलगुरू डॉ. संजय देशमुख

दरवर्षी यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव काहीतरी वेगळे देत असते. या वर्षी या चित्रपट महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे ते महाविद्यालयीन विद्यार्थांनी केलेले चित्रपटाचे समीक्षण. चित्रपट निव्वळ न पाहता तो वाचता देखील यावा या उद्देशाने  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘चित्रपट समीक्षण कार्यशाळेचे’ आयोजित करण्यात आले होते. दिनांक ९ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० वाजे पर्यंत मुंबई विद्यापीठामधील अल्केश मोदी हॉल येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी केले. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल आणि चित्र- नाट्य अभ्यासक समर नखाते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘’चित्रपटाचा आस्वाद कसा घ्यावा याकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठ ७ व्या यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे सहयोगी आहेत. पुढील वर्षी हा चित्रपट महोत्सव विद्यापीठाच्या आवारात करावा अशी विनंती डॉ. जब्बार पटेलांना करतो’’, असे उदगार डॉ. देशमुख यांनी काढले.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft