crear sitio web con WordPress

मुंबईत वाचक जागराला सुरूवात

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी प्रकाशकांची प्राथमिक बैठक नूकतीच आयोजित करण्यात आली होती. मराठी वाचन संस्कृती वाढावी, वाचक संख्या वाढावी या उद्देशाने ग्रंथालयाच्या विश्वस्त खा. सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला विश्वस्त अरविंद तांबोळी, ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे, प्रमुख कार्यवाहक विश्वास मोकाशी आणि प्रतिष्ठानचे कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी मार्गदर्शन केले.

या बैठकीला राज्यभरातील ३० हून अधिक प्रकाशक सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'वाचकजागर' उपक्रम तात्काळ घेण्याचे ठरले. जून महिन्यापासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमुख कार्यवाह विश्वास मोकाशी यांनी केले. तसेच त्यांनी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात वाचकांचा राबता वाढवा म्हणन सर्वातोपरी सहकार्य करेन असे त्यांनी सांगितले. दोन्ही संस्थांच्या आवाहनाला प्रकाशकांनी प्रतिसाद देताना काही महत्त्वपुर्ण मुद्दे मांडून काही उपक्रम आणि योजनांची माहिती दिली.

विकास परांजपे यांनी वाचन जागर उपक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. पुढील पिढीला वाचनाचा आनंद मिळावा म्हणून अभिवाचन उपक्रम करावा असा सल्ला दिला. पत्रकार शीतल करदेकर यांनी प्रकाशक, वाचक आणि लेखक यांच्या भेटीचा एक दिवस ठरवावा, प्रत्येक प्रकाशकाने आपले पुस्तकं ग्रंथलयास भेट द्यावी असे मत मांडले. तसेच सुदेश हिंगलासपूरकर यांनी जसा ग्रंथालयाने सहकार्याचा हात पुढे केला आहे, तसा प्रकाशकाने सहकार्य करावे, मी ग्रंथालीच्या नियतकालिकात या उपक्रमासाठी दोन पाने देत असल्याचे सांगितले. माधव शिरवळकर यांनी दुर्मिळ पुस्तकं डिजिटलाईज होण्यासाठी ओसिआर तंत्राचा वापर करावा. तसेच तरूणांना वाचणाची आवड निर्माण होण्यासाठी किंडल साधणाचा वापर करावा असे त्यांनी सुचविले. अस्मिता विभाग यांनी संदर्भ विभाग अधिक लोकाभिमुख करण्याची विनंती केली. लता गुठे, अमोल नाले, संतोष बाईंग, अरविंद जोशी, विवेक नेत्रे, अरुण म्हात्रे, श्रीधर ठोंबरे, श्रीमती विद्या फडके व इतर मान्यवर बैठकीत सहभागी झाले होते. यापुढील दर तीन महिन्यातून अशी एक बैठक घेण्याचे ठरले आहे.

   
Copyright © 2016 Yashwantrao Chavan Pratishthan, Mumbai. All Rights Reserved. Designed by Pujasoft